
आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते आणि पावसाचे टपोरे थेंब धरतीवर कोसळू लागतात. मातीचा सुगंध दरवळू लागतो आणि क्षणात वातावरण बदलून जाते. अशा वेळेस खावीशी वाटते गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा. पावसाळ्यातले असे काही कॉम्बिनेशन्स खवय्यांना टाळता येणे अशक्य. असेच आणखी एक वर्ल्ड फेमस कॉम्बिनेशन म्हणजे पावसाळा आणि सुके मासे.
जेवताना गरम गरम भात आणि सोबत सुक्या मच्छी चे कालवण किंवा कांदा घालून केलेली सुकी मच्छी फ्राय. हे असे जेवण म्हणजे स्वर्गसुख. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ओल्या/सुक्या बोंबलाची रस्सा भाजी आणि ओतीव भाकरी. हेही स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. यातील एक एक घास खाताना आणि पोटात ढकलताना जी मज्जा येते ती शब्दात सांगणे अशक्य.
तुम्ही जर कधी असा अनुभव घेतला नसेल तर वाट कसली बघताय. लगेच जेवण बनवायला घ्या आणि पावसाळ्याचा पुरेपूर आनंद घ्या. स्वतः खा आणि घरच्यांनाही खाऊ घाला. रेसिपीस खाली आहेतच. या सगळया रेसीपीज आगरी असून त्या इन्स्टंट बनणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फार वेळ थांबावेही लागणार नाही. चला मग लागा कामाला….!!!!!
ओल्या बोंबलाचे कालवण
साहित्य :
ओले बोंबील – ५ मध्यम आकाराचे
हिरवी मिरची २-३
लसूण ७-८ पाकळ्या
आले १ इंच
तेल १ टेबलस्पून
आगरी मसाला किंवा लाल मसाला १ टीस्पून
हळद १/४ टीस्पून
चिंच लिंबाएवढी
कोथिंबीर मुठभर
टोमॅटो १
पाणी
मीठ
कृती :
बोंबील साफ करून त्याचे १ इंच असे तुकडे करून घ्या.
वाटण तयार करण्यासाठी मिरची कोथिम्बीर आले लसूण एकत्र करून पेस्ट करून घ्या. हे तुम्ही मिक्सर ला थोडेसे पाणी घालून वाटून घ्या किंवा खलबत्यात कुटून घ्या.
आता पातेल्यात तेल घालून तापल्यावर त्यात वाटण घाला. ते परतून त्यात टोमॅटो बारीक चिरून घाला. टोमॅटो शिजल्यानंतर त्या मसाला हळद घाला. तेल सुटल्यानंतर त्यात दिड कप पाणी घाला. चिंचेचा कोळ तयार करून त्यात घाला. चवीपुरते मीठ घाला.
आता मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात एक एक बोंबलाचा तुकडा सोडा.३-४ मिनिटे शिजू द्या. मीठ आणि आंबटपणा बरोबर आहे कि नाही ते खात्री करून घ्या. गॅस बंद करा. बोंबलाचे कालवण तयार. वरून कोथिंबीर घाला.
ओतवल्या / ओतीव भाकरी
साहित्य :
तांदळाचे पीठ (जाड) २ वाट्या
गव्हाचे पीठ १ वाटी
मीठ
पाणी
कृती :
एका बाउल मध्ये तांदळाचे पीठ गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून कालवून घ्या. डोसा कन्सिस्टन्सी प्रमाणे पीठ कालवून घ्या.
गॅसवर तवा तापायला ठेवा. शक्यतो लोखंडाचा तवा वापरा. तवा तापल्यानंतर
त्यावर एक डाव हे मिश्रण घालून डोश्याप्रमाणे पसरवून घ्या. त्यावर हलकेसे पाणी शिंपडून झाकण ठेवा. ४०-५० सेकंदानंतर झाकण काढा. कालथ्याने भाकरी काढून दुसर्या बाजूने सजेकु घ्या. साधारण २० सेकंदात भाकरी काढा आणि कालवणासोबत सर्व्ह करा.