कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय …

पावसाळ्याच्या मोसमात निसर्ग हिरवा शालू नेसून असतो. जिथे तिथे हिरवळच हिरवळ. अश्याच एका रविवारी फेरफटका मारत असताना दिसला “टाकळा”. हिरवागार टाकळा. हि एक पावसाळी भाजी आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर २-३ दिवसातच धरतीतून हे टाकळे उगवायला सुरवात होते. चवीला थोडासा कडवट असलेला आणि साधारण अंडाकृती अशी याची पाने असतात. कोवळ्या टाकळ्याची भाजी, भजी, आणि तत्सम पदार्थ करता येतात. असा हा टाकळा कावीळ या आजारावर रामबाण उपाय म्हणूनही प्रसिद्ध आहे. वर्षातून एकदातरी ही भाजी खावीच असे पूर्वज सांगतात. त्यामुळे कावीळ आजार व्हायची शक्यता खूप कमी होते. टाकळ्यासोबत बाकी औषधी भाज्या देखील पावसाळ्यात उगवतात.

शास्त्रीय नाव: Cassiatora

कुळ : caesalpinaceae

टाकळा ही वर्षायू वनस्पती सिसाल पिनेसी म्हणजेच आपटयाच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत ऊंच वाढते. या वनस्पतीला काही भागात तरोटा किंवा तरवटा अशी स्थानीक नावे आहेत.
टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतात, बागांमध्ये, जंगलात, मोकळ्या मैदानावर, मोकळ्या जागी, रस्त्याच्या दुतर्फा जास्त प्रमाणात आढळतो. त्याची ४ ते ५ पाने निघाली कि तो खाण्यायोग्य कोवळा असतो. याचे रोप साधारण १ ते २ फूट वाढते. नंतर याला पिवळी फुले आणि लांब बारीक शेंगा येतात. शेंगा फुटून बी खाली पडते आणि पुढील वर्षी पुन्हा टाकळा उगवतो. याची चव थोडी कडवट असल्या कारणाने गुरे ढोरे हे खात नाहीत. असा हा टाकला आरोग्यदायी असून वर्षातून एकदा तरी खावा. मुंबई ठाणे या सारख्या शहरी भागात बाजारात पावसाच्या सुरवातीच्या दिवसात ही भाजी मिळते.

खोड व फांदयाः गोलाकार, खोडाच्या तळापासून अनेक फांदया तयार होतात.

पाने: संयुक्त प्रकारची, एकाआड एक, पर्णिका रात्री मिटतात.

फुले: पिवळसर रंगाची, थोडीशी अनियमीत, द्विलिंगी, पानांच्या बेचक्यात जोडीने येतात. पाकळया पाच, पुंकेसर सात, बीजांडकोश एक

कप्पी शेंगा : १० ते १६ सेंमी लांब, कोवळया असतांना वर्क, बिया २५ ते ४० तपकिरी काळसर किंवा करडया रंगाच्या, कठीण कवचाच्या.


तर आज मी एक सोप्पी टाकळा वरण रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया कसे बनवायचे हे पौष्टिक वरण.
साहित्य:
उकडलेली डाळ १ वाटी
टाकळा १५-१६

फोडणीसाठी:
लसूण २-३ पाकळ्या
राई पाव चमचा
जिरे पाव चमचा
हिंग चिमूटभर
थोडीशी हळद
मीठ चवीप्रमाणे
कढीपत्ता ६-७ पाने
कोथिंबीर
तेल १ चमचा

कृती:
सर्वप्रथम वरणासाठी जशी डाळ उकडवून घेतो त्याप्रमाणे उकडवून घ्या. अर्धी वाटी तूर/मूग डाळ तासभर पाण्यात भिजत घाला. पाणी निथळून त्यात पाव चमचा हळद, एक छोटा टोमॅटो, २ मिरच्या कापून घाला. कूकरमध्ये मूग डाळीसाठी ३ तर तूर डाळीसाठी ४ शिट्या घ्या. वाफ निघाल्यावर डाळ फोडणीसाठी वापरा.
टाकळ्याची कोवळी पाने तोडून घ्या. जर देठ कोवळे असतील तर तेही वापरण्यास हरकत नाही. पाने स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो पाने कापू नये. कापल्यामुळे कडवटपणा भाजीत अथवा वरणात उतरतो. न कापता पाने वापरल्यास वरण कडू होत नाही.
पातेल्यात तेल घालून तापल्यानंतर तर मोहरी, जिरे, हिंग, लसूण, कढीपत्ता याची फोडणी द्या. लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर त्यात पाने घाला. थोडंसं परतून घ्या. हळद घाला.
आता यात उकडलेली डाळ घाला. गरजे प्रमाणे पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला. वरणाला उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर ३-४ मिनिटे शिजवा. कोथिंबीर घाला. वरण तयार आहे. भाकरी किंवा गरम भातासोबत सर्व्ह करा.

औषधी उपयोगः

१. टाकळयाच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत एमोडीन ग्लुकोसाइड आहे. याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोंगांवर गुणकारी आहे.

२. त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होतो. त्वचारोगात पानांची भाजी देतात व बिया वाटून लेप करतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे.

३. पाने व बियांमध्ये क्रायझोजेनिक आम्ल असून ते त्वचारोगात उपयुक्त आहे.

४. लहान मुलांना दात येतेवेळी टाकळ्यांचा पानांचा काढा दिल्यास लहान मुलांना ताप येत नाही.

५. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला यांत पानांचा रस मधातून देतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *