अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू

अळूवडी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे. चवीला खमंग, कुरकुरीत अशी. काहीजण ओले खोबरे घालून करतात तर काही बिन खोबऱ्याची. प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव निराळी. तर या अळू बद्दल आज आपण बोलणार आहोत.
त्याच्या किती वेगवेगळ्या जाती. अळुवडीचा वेगळा, भाजीचा वेगळा. अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू असे अनेक प्रकार आहेत. भाजीसाठी पण काळा अळू आणि पांढरा देखील. काहीठिकाणी अळूच्या कांद्याची/कंदाची म्हणजेच अरवीची भाजी केली जाते. तर ते उकडवून किंवा कटलेट बनवून खाल्ले जातात. अळुवडीचा अळू जास्त काळा असतो तर भाजीचा कमी काळा असतो. त्याची पाने अगदी हिरवीगार असतात. अळुवडीच्या पाने थोडी जांभळट काळपट असतात आणि जाड देखील. भाजीचा पांढरा अळू तर देठाला पांढरा आणि पाने हिरवीगार पोपटी. भाजी करताना शक्यतो कोवळी पानेच वापरली जातात. अळूची पाने, देठ वापरून आमटी करतात. वाल, चणे या बरोबर आमटी खूपच चविष्ट लागते. अळू खरजवअसल्याने त्यात चिंच गुळाचा वापर केला जातो. पण या खरजव अळूची पण गोष्ट आहे बरं का. सगळेच अळू घशाला खवखवत नाहीत. एक खाजखुजली म्हणून वेल असते. वेलीला सोनेरी रंगाची लव असलेली फळे येतात. हि लव जर चुकून हाताला व शरीराला कुठे लागली तर आपली खाजवून खाजवून पुरती वाट लागलीच समजा. जर या खाजखुजलीचे वेल असेल आणि त्या ठिकाणचा अळू खाल्ला तर तो जास्त खारजवं करतो. अन्यथा बाकी अळूची इतकी खाज नसते. अळू कापताना जो रस निघतो तो जर कपड्याला लागला तर ते जगभरातल्या टाइड एरियल सर्फ एक्सेल अशा कशानेच निघत नाहीत. शेवटी त्याचे पोतेरे करावे लागते. त्यामुळे अळू साफ करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यात हात काळपट होतात ते वेगळे. हाताला खाजही सुटते. तसे झाल्यास मिठाने चोळून हात धुवावेत. या सगळ्यात शोभेच्या अळू वेगळा. रंगबिरंगी हिरव्या पानावर पांढरे गुलाबी ठिपके. काही अळू तर हिरव्या पानांवर पांढरी छटा असणारे. वेगवेगळ्या जाती.

तर आज आपण बघणार आहोत पांढऱ्या अळूची भाजी. भाजीचा कोणताही अळू वापरला तरी चालतो. परंतु पांढऱ्या अळूची भाजी खूप चविष्ट होते. अळुवडीचा अळू शक्यतो वापरू नये. एकतर हा अळू वर्षभर मिळतो. पण भाजीचा अळू पावसाळ्यातच मिळतो. माळरानावर शेतात घराच्या मागे गटाराच्या बाजूला. असा ठिकठिकाणी उगवेल असतो. पण जंगलातला साचांगल्या जमिनीतला अळू भाजी करण्यासाठी वापरावा. पांढर्‍या अळूला आदिवासी समाजात ऐना असे संबोधले जाते. काही ठिकाणी अळूचं फदफदं असं देखील म्हणतात पण आगरी भाषेत अळूची भाजी असेच म्हणतात. तर पाहूया पांढऱ्या अळूची भाजी.

साहित्य:
भाजीचा अळू देठांसकट १ जुडी
भिजवून मोड आलेले कडधान्य मूग/वाल/ चणे १ वाटी
आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि ओले खोबरे यांची एकत्रित पेस्ट
लाल तिखट १.५ चमचा
हळद पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
कांदा १ माध्यम आकाराचा
तेल २ चमचे
हिंग पाव चमचा
जिरे पाव चमचा
चिंच थोडीशी
गुळ १ चमचा

कृती:
सर्वप्रथम अळूचे देठ कापून त्याचे वरचे साल काढून बारीक चिरून घ्या. पाने देखील बारीक चिरून घ्या. हा अळू थोड्याश्या पाण्यात घालून कुकर मध्ये १ शिट्टी घेऊन वाफवून घ्या. कडधान्य देखील वाफवून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या. आता एका पातेल्यात तेल घालून त्यात जिरे, हिंग यांची फोडणी द्या. त्यात कांदा घालून थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात वाटण घाला. ते परतल्यावर त्यात अळू आणि कडधान्य घाला. लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ घाला. गरजेप्रमाणे पाणी घाला. त्याला उकळी आल्यानंतर त्यात चिंचेचे पाणी आणि थोडासा गुळ घाला. २ मिनिटे चांगली उकळी येउद्या. अळूची भाजी/ आमटी तयार आहे. गरम गरम भाताबरोबर अथवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

भाजीचा अळू

#अळू#भाजी#रानभाजी#अळूवडी#अळूची आमटी#अळूची भाजी#ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *