अतिशय उपयुक्त अशी रानभाजी – करटोली

करटोली हे बहुवर्षायु वेलवर्गीय भाजीपाला पीक असून कुकरबीटीसी म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील हे पीक आहे. करटोलीचे शास्त्रीय नाव Momordica dioica (मोमारडीका डायओयिका) असून स्थानिक नावे भाषेत करटोली, कारटोली, कंटोली, रानकारली, कार्कोटकी, करटुली, करटोला असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, धुळे, पुणे व विदर्भात काही जिल्ह्यांतील जंगलामध्ये कारटोली आढळून येते. पाऊस सुरु झाला की निर्सगात असलेल्या कंदाला कोंब येऊन जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात करटोली विकायला बाजारात येतात. करटोलीला ग्राहकांची खूप मागणी असल्यामुळे बाजारभाव नेहमीच वाढलेले असतात. साधारण १५० ते २०० रूपये पर्यंत किलो भाव पालघर जिल्ह्यात असतो. तर मुंबई, ठाणे शहरांमध्ये करटोलीचा भाव २५० ते ३०० रूपये पर्यंत किलो असतो. पालघर जिल्ह्यात बाजारात जी करटोली विक्रीला येते ती करटोली निर्सगात उगवलेल्या वेलीची असतात. त्यामुळे करटोलीची व्यवसायिक लागवड करून चांगल उत्पादन घेऊन त्याचबरोबर करटोलीची रोपे तयार करून रोजगार निर्मिती होऊ शकते आणि याच उद्देशाने लागवडीची तांत्रिक माहीती देण्याचा प्रयत्न केला आहे.

करटोलीचे आहारातील महत्व :-

१) करटोली शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यात मदत करते त्यामुळे मधुमेही रूग्णांना उपयुक्त

२) कोवळी फळे स्वादिष्ट, पोट साफ होण्यासाठी, पित्ताचा स्त्राव नीट होण्यासाठी उपयुक्त.

३) कांदा उपयोग मुतखडा, विषबाधा, हत्तीरोग, दमा, ताप, मुळव्याधी मध्ये गुणकारी आहे.

४) करटोलीची फळे थंड व पौष्टीक असून सेवन केल्यावर पचन क्रिया सुधारते.

५) करटोली फळे यकृतासाठी अत्यंत आवश्यक आहे.

६) करटोली मध्ये अॅन्टीऑक्सीडेंन्ट तसेच अन्नद्रव्याचे प्रमाण भरपूर असते. उदा. बिटाकॉरोटीन, जीवनसत्व क, मेग्नेशियम इतर

७) करटोलीचे भाजलेले कंद मुळव्याधी रक्तस्त्राव थाबंविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद, कफस्तर्जन आणि थंडी वाजुन येणाऱ्या तापात उपयुक्त आहे. पाने कामोत्तेजक व कृमीनाशक असून,
त्रिदोष, ताप, बद्धकोष्ठता , दमा, श्वसन नलिकादाह, उचकी यात गुणकारी आहे.

८) अतिलाळ सुटणे, मळमळ, ह्रदयाचे त्रास यात ही करटोली गुणकारी आहे.

९) सर्दी, खोकला, ताप या पावसाळयातील विकारांवर करटोलीची भाजी उपयुक्त आहे.

१०) त्वचारोग होऊ नये म्हणून ही भाजी अवश्य खावी.

वरील दिलेली माहिती कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या करटोली लागवड तंत्रज्ञान या घडीपत्रिकेतून घेण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *