गुडदाणीचे दिवस …
आमच्या लहानपणी यांव होतं आन त्यांव होतं असं म्हणायची सवय बऱ्याच लोकांना असते.
मला पण आहे.
कारण ते दिवस विसरताच येणार नाहीत.
हल्लीच्या पोरांचं कचकड्याचं बालपण बघितलं की त्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीची हटकून आठवण होतेच होते.
ते आभावाचे पण किमान अपेक्षांचे दिवस होते.
अपेक्षा किमान तर अपेक्षाभंगाचे क्षण पण कमी म्हणून थोडक्यात भरपूर आनंद मिळायचा.
आज परत आठवणीची उबळ यायचं कारण असं की …
आज कामाचा निरोप द्यायला म्हणून भगवंत मंदिरा समोर एका दुकान गेलो आणि समोर रेवडी, गुडदाणीनं भरलेल्या पराती दिसल्या.
संक्रांती निमित्ताने विक्रीला आल्या असाव्यात.
बापजाद्यांनी गाडग्यात भरून भिंतीत दडवलेला खजिना सापडल्या सारखं झालं.
काय असते बरं ही गुडदाणी?
आम्ही बारके होतो तेव्हा गुडदाणी बनवायची कला प्रत्यक्ष बघितली आहे.
आमच्या माळे गल्लीत संदीपान जाधव नावाचा कारागिर गुडदाणी बनवायचा.
आणि काटकोनात असलेल्या सावळे गल्लीच्या चढा वर जिरंगेंची भट्टी होती.
तिथं खारमुरे,फुटाणे,डाळे,चुरमुरे,साखर फुटाणे, बत्तासे,रेवडी आणि गुडदाणी बनवली जायची.
बार्शीत अशा अनेक भट्टया होत्या.
पण सगळा खाऊ हमखास मिळायचा तो पांडे चौकातल्या जिरंग्यांच्या दुकानात.
ही गुडदाणी म्हणजे लोणावळ्याच्या फेमस मगनलाल चिक्कीची आईचं म्हणायला हरकत नाही.
दोघींचा स्वभाव पण तस्साच.
चक्की लाडानं शेफारलेल्या पोरी सारखी कडक तर गुडदाणी आई सारखी दिलायला कडक पण आतून एकदम मऊसुद.
भट्टीच्या समोरून जाताना रसायन विरहित गावठी गुळाचा पाक बनवतांना गुळचट सुगंध खेचुन घ्यायचा.
एका मोठ्या परातीत खरपूस भाजून सालं काढलेल्या शेंगदाण्यांची फूट आणि दुसऱ्या परातीत भाजलेले राजगिरे असायचे.
पहिल्यांदा एका रिकाम्या परातीत गुळाचा दाट पाक घेतला जायचा.
त्याची हातानं थापून गोल भाकरी बनवली जायची.
मग ही भाकरी शेंगदाण्याच्या परातीत दोन्ही बाजूंनी थापली जायची.
शेंगदाण्याचा थर बसला की शेवटी राजगिरीच्या परातीत थापून दोन्ही बाजूंनी शेवटचा थर दिला की झाली गुडदाणी तयार.
मग ह्या तयार झालेल्या गुडदाण्या एका कापडावर पसरून सुकवल्या जायच्या.
रेवड्या बनवायची पद्धत मात्र अगदी वेगळी.
गुळाच्या पाकात भाजलेले तिळ मिसळून लांबट गोळ्या बनवतात ती रेवडी.
कलाकारी बघण्यात गुंगलेल्या आमच्या हातावर कारागिर हसतमुखानं एखादी रेवडी किंवा बनवताना तुटलेल्या गुडदाणीचा एखादा तुकडा ठेवायचा.
आनंदी आनंद गडे …
पिशव्यात रेवड्या आणि लोखंडी पाटीत गुडदाण्या भरून दुकानात विक्रीला पाठवल्या जायच्या.
गुडदाणीची गोल गरगरीत भाकरी विकत मिळायची.
अख्खी भाकर नको असेल तर वजनावर मिळायची.
रेवड्या मात्र वजना वरच मिळायच्या.
सुट्या तर पाच पैशाला चार पाच पण मिळायच्या.
आठवडे बाजाराला गेलेल्या माणसांची रेवड्या, गुडदाणीच्या आशेनं वाट बघत पोरं घराच्या दारा समोर घुटमळत रहायची.
बाप, आई,आज्जा, आज्जी दिसली रे दिसली की धावत जाऊन त्यांना लटकेलेली लेकरं अजून डोळ्या समोर उभी राहतात.
जत्रेला गेल्यावर तर हमखास गम्मत म्हणजे बत्ताशे,रेवड्या आणि गुडदाणी.
नंतर कधी तरी खाऊ मध्ये लिमलेटच्या गोळ्या आल्या.
बिस्किटांनी पण घुसखोरी केली.
आता तर कडवट कृत्रिम गोडीच्या टॉफी आणि चॉकलेटांनी सगळं बालपण पादाक्रांत केलय.
आज तिचं दर्शन झालं आणि आठवले..
गुडदाणीचे दिवस ….
Post by
Dr. Dilip Kadam, Barshi
धन्यवाद!