पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मासेमारी ३-४ महिने बंद असते. मग अशा वेळेस खादाडी मोर्चा सुक्या मच्छीकडे वळवावा लागतो. पावसाळ्यात या मच्छीची चव काही औरच लागते. तर आपल्यासाठी आहे एक चमचमीत अशी सुक्या बोंबीलाची रेसीपी. जी बनवल्यावर दोन घास तुम्ही नक्कीच जास्त खाल ही गॅरंटी.
तर आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण किंवा बोंबील बटाटा भाजी. त्यासाठी आपल्याला खालील पदार्थांची आवश्यकता आहे.
सुके बोंबील सहा ते सात
बटाटे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो एक
दोन कांदे
आलं एक इंच
लसूण पाकळ्या सात ते आठ कोथिंबीर एक मूठ
मिरच्या दोन ते तीन
आगरी मसाला दोन चमचे किंवा एक ते दिड चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला
तेल दोन चमचे
मीठ चवीपुरते
चिंच अर्धा लिंबू इतकी किंवा कोकम आगळ ३ चमचे
आता सर्वप्रथम बोंबील साफ करून घ्या. बोंबलाचे डोके, पंख (पाख/कल्ले) आणि शेपटी काढून घ्या. पोटाजवळचा काळा भाग काढून घ्या. त्यानंतर बोंबलाचे एक इंचाचे तुकडे करून दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
आपल्याला वाटणासाठी लागणार आहे लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरची. हे एकत्र करून त्याचे वाटण करून घ्या. यासाठी लागणारा कांदा जाड चिरून घ्या. टोमॅटो आणि बटाट्याच्या मोठ्या फोडी कापा.
पातेल्यात थोडसं तेल घालून कांदा टाकून थोडा परतून घ्यायचा आहे. थोडा कांदा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर थोडा मऊ झाल्यानंतर त्यात हे वाटण टाकायचे आणि शिजवून घ्यायचे आहे. हे शिजल्यानंतर त्यात आगरी मसाला टाकायचा आहे. त्याच बटाटे घालायचेत. वाफेवर थोडं शिजू द्यावे. झाकण ठेवून त्यात पाणी घालून वाफ घ्या. आता बटाटे घातल्यानंतर बोंबील देखील लगेच घालायचे नाही. थोड्या वेळाने घालायचे.
बटाटे अर्धे शिजायला आले असं वाटल्यास त्यानंतर बोंबील घालायचे. त्यानंतर भाजी मध्ये पाणी घालून भाजी शिजू द्यावी. झाकण ठेवा. झाकणात पाणी ठेवा आणि भाजी शिजू द्या असं करताना झाकण काढून चेक करायचंय की बटाटा पूर्ण शिजला गेला की नाही. बोंबलाचे तुकडे आपण आधीच टाकले तर ते जास्त शिजल्यामुळे त्याचा पूर्ण चुरा होऊ शकतो म्हणून ही काळजी आपण घ्यायची की अर्धे बटाटे शिजल्यानंतर बोंबील घाला.
बोंबील, बटाटा शिजल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ घाला. मीठ घाला. मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे. कारण सुक्या बोंबीलला मीठ असते पण ते आपण धुतो त्यामुळे त्याचे मीठ निघून जाते. अशाप्रकारे चांगली उकळी द्यायची आहे. बटाटा थोडा ठिसूळ होईपर्यंत शिजवल्यास भाजीची चव अप्रतिम लागते. तर ही झाली बोंबील बटाटा भाजी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भात/भाकरी/चपाती/पावासोबत खा.