माझे खाद्याचे प्रयोग …
सामिष पालक वडी …
मनवा मानत नाही…
उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.
आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला.
आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.
रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला.
पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं.
मग जिभेनं बंड केलं आणि लागली वळवळायला.
तिला शांत नाही केलं तर आठवडाभर त्रास देणार.
म्हणून म्हणलं चला कांही वेगळं करू या.
सामिष पालक वडी …
साहित्य –
दोन वाट्या बारीक चिरलेला पालक
एक वाटी बेसन पिठ
अर्धा वाटी ज्वारीचं पिठ
पाच सुके बोंबिल आठ लसूण पाकळ्या
चार हिरव्या मिरच्या
एक चमचा जिरे
एक चमचा मिठ
एक चमचा ओवा
दोन चमचे तिळ
अर्धा चमचा हळद
कृति –
सगळ्यात पहिल्यांदा पाच सुके बोंबिल नीट भाजून मिक्सर मधून भरड काढून घ्यायची.
आता बाकी सगळं साहित्य एकत्र करून मळून घ्यायचं.
गरज लागलीच तर अगदी थोडं पाणी वापरायचं.
सर्वात शेवटी बोंबिल भरड मिसळून घट्टसर मळून घ्यायचं.
मळलेल्या पिठाचे लांबट गोल रोल करून घ्यायचे. स्टीम करून घ्यायचे आणि थंड झाले की वड्या पाडून डीपफ्राय करायच्या.
ह्या कुरुमकुरुम वड्या सांबर – भाता बरोबर तोंडी लावायला लय मज्जा आली बगा!
उरलेल्या वड्या सॉस बरोबर आता दोन दिवस स्नॅक्स म्हणून खाता येतील.