बोंबील फ्राय
साहित्य :
बोंबील 5
हिरवी मिरची (तिखट) 2
लसूण पाकळ्या 6 ते 7
आले अर्धा इंच
कोथिंबीर अर्धा मूठ
आगरी मसाला 1.5 टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
रवा 2 टेबलस्पून
तांदळाचे पीठ 1 टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कृती :
- बोंबील साफ करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. मधोमध चिरून घ्या. मोठे बोंबील असल्यास दोन तुकडे करू शकता, लहान असतील तर अख्खे ठेवा.
- बोंबील थोडे निथळू द्या. बोंबीलातले पाणी पूर्ण निथळल्यास ते क्रिस्पी होतात. बोंबील एका ताटात पसरवून त्यावर वजन पोळपाट किंवा पाटा ठेवल्यास पाणी निथळायला मदत होते.
- मिरची, कोथिंबीर, आले, लसुण एकत्र करून वाटण करून घ्या. खलबत्ता अथवा पाट्यावर वाटण केल्यास जास्त चांगली चव येते. बोंबील टेस्टी बनतात.
- बोंबील पिळून घेऊन त्यावर आगरी मसाला, हळद, मीठ, ओले वाटण व्यवस्थित चोळून घ्या.
- दुसर्या ताटात रवा, तांदळाचे पीठ, किंचित मीठ घालून एकत्र करा.
- आता तवा तापायला गॅसवर ठेवा. तापल्या नंतर त्यात 2 टीस्पून तेल घाला. बोंबील शॅलो फ्राय करणार असल्याने जास्त तेल घालू नये.
- बोंबील रवा पीठ मिश्रणात व्यवस्थित घोळवून तव्यात फ्राय करायला ठेवा. गॅसची आच मध्यम ठेवा. आच मोठी ठेवल्यास मसाला करपून जातो.
- 2-3 मिनिटात किंवा खालची बाजू क्रिस्पी झाल्यावर बोंबील पलटून वरची बाजू फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास अर्धा टीस्पून तेल घाला.
- दोन्ही बाजूने क्रिस्पी झाल्यावर सर्व्ह करा.