रानभाजी : भुईआवळा
शास्त्रीय नाव: Phyalanthus amarus
कुळ : Euphorbiaceae
भुईआवळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून २० ते ५० सेमी उंच वाढते. जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
ओळखः
खोड: खोड व फांदया गोलाकार, खोडाला बुंध्यापासुनच फांदया फुटतात.
फुले : : लहान, पिवळसर, हिरवी रंगाची, पानांच्या बेचक्यात मागील बाजूस वळलेली, फुल एकलिंगी, नरफुले व मादी फुले एकाच फांदीवर
फळे: आवळयासारखी गोलाकार पण आकाराने लहान, फळांना आवळयासारखी रूची, बिया लहान
औषधी उपयोगः
१. कावीळ झाल्यास भुईआवळा वाटून दुधाबरोबर सकाळ-संध्याकाळ देतात
२. भुई आवळयाचा वापर यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी करण्यास करतात
३. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो, लघवी कमी होणे, मुतखडा, जंतुसंसर्ग होणे आदी विकरावर या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो.
४. रक्तदाबवृद्वी, चक्कर येणे या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा होते. ५. फ्लूसारख्या थंडी-तापाच्या आजारात तसेच वरचेवर सर्दी खोकला, ताप येणे अशा लक्षणात ही भाजी नियमित खावी.
भाजीसाठी वापरात येणारे भाग :
भुईआवळयाची पाने, कोवळी खोडे व फांदया
भुईआवळयाची भाजी:
साहित्यः
स्वच्छ केलेली भाजी 2 वाटी
तूर, मसूर किंवा मूगडाळ अर्धी वाटी
लसूण पेस्ट १ चमचा
तेल २ चमचे
हिरव्या मिरचीची पेस्ट
मीठ चवीनुसार
हळद १ चमचा
डाळीचे पीठ २ चमचे
कृती:
१. तेलाच्या फोडणीत लसूण पेस्ट टाकावी.
२. भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवून घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे. नंतर फोडणीत भाजी घालावी.
३. मिरची पेस्ट, मीठ दाणेकूट व थोडासा गूळ घालून भाजी शिजवावी.