शास्त्रीय नाव: Clerodendrum.serratum
कुळः verbenaceas
भारंगी ही वनस्पती व्हर्बेनेसी म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे झुडूप तीन ते पाच फुटापर्यत उंच वाढते. भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरटया जंगलात नदीनाल्याच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळयाच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.
ओळख:
पाने: साधी समोरासमोर किंवा तीन पाने मंडलामध्ये, १० ते १५ से.मी. रूंद, लंबवर्तुळी, दोन्ही टोकाकाडे निमुळती, टोकदार कडा कातरलेल्या, फांदया चौकोणी असतात.
फुले: निळसर पांढरी, फांदीच्या टोकावर, पाकळ्या निळसर पांढऱ्या पण खालचा भाग गर्द निळा, बोटाच्या आकाराच्या त्यावर लांबट पांढरट हिरव्या ग्रंथी.
औषधी उपयोगः
१. भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंग मुळ प्रामुख्याने वापरतात.
२. दम्यावर भारंगमुळ ज्येष्ठमध, बेहडा व अडूळसाची पाने यांचा काढा करून देतात. दमा होऊ नये म्हणून भारंगीच्या पानांची भाजी खातात. यांच्या कोवळया पानांची भाजी चवीला रूचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
३. पोट साफ होण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून त्यातील पाणी गाळून प्यावे, पोट जड असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळयाभोवती किंचीत सुज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घटट होणे अश्यावेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरी बरोबर खावी.
भारंगीच्या पानांची भाजी
साहित्य:
भारंगीची कोवळी पाने १ वाटी
आले लसणाची पेस्ट १ चमचा
मिरची २-३
टोमॅटो १
कांदा १
हळद, लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा
तेल २ चमचे
गुळ, चिंच चवीनुसार
मीठ चवीनुसार
कृती:
१. तेलावर कांदा परतवून घेणे व त्यात वरील सर्व साहित्य टाकणे.
२. चिरलेली भारंगीची पाने फोडणीत टाकणे.
३. थोडी भाजी शिजत आल्यावर त्यावर थोडासा पाण्याचा हबका मारावा.
४. भाजी शिजत आली की चवीपुरते प्रमाणात गुळ व चिंच घालून गॅस ५ मिनीटानंतर बंद करावा.