माझे खाद्याचे प्रयोग …सराट्याची भाजी

सरत्या पावसाळ्यात आता रानभाज्या कमी व्हायला लागतात.
तरीही आमच्या मनिषाताईंनी आज सराट्याची भाजी दिली.

ह्या भाज्या मंडईतल्या इतर भाज्यांच्या मनाने महाग वाटतात.
पण रानभाज्या गोळा करायची मेहनत बघता आपण पैशा बाबत फार घासाघीस करू नये असं मला वाटतं.

नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या रानभाज्याना कोणतंही खत किंवा जंतुनाशक वापरलेलं नसतं त्यामुळं शंभर टक्के विषमुक्त असतात.

सराटा म्हणजे गोक्षुर किंवा मराठीत काटे गोखरू.
ही वनस्पती आयुर्वेदात फार उपयुक्त मानली जाते,खास करून मूत्रसंस्थेच्या विकारांवर.

रान भाज्यांचे फार नखरे नसतात.
दोन चमचे तेल,दोन कांदे,हिरव्या मिरच्यांचा खर्डा,हळद -मिठ एवढं असलं की बास झालं.

एवढंच साहित्य वापरून आजची ही सरट्याची भाजी तयार केलीय,थोडं शेंगदाण्याचं कुट वापरलय एवढंच.

रानभाज्या खायच्या तर फक्त ज्वारीच्या गरमागरम भाकरी बरोबरच.
सोबतीला थोडी तुरीच्या डाळीची आमटी असली तर उत्तमच.

पण आज सकाळीच जास्तीच्या चपात्या करून ठेवल्या होत्या.
म्हणून त्यांच्या बरोबरच भाजी फस्त करून श्रावण समाप्तीची रीतसर घोषणा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *