जर तुम्ही नवरात्रात नऊ दिवस उपवास करत आहात आणि नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन बोअर झाला असाल…. तर मग या युनिक रेसीपीज नक्की करून पहा.
आम्ही सादर करत आहोत डॉ. दिलिप कदम, बार्शी यांचे “माझे खाद्याचे प्रयोग”
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
१. केळ्याचं आईस्क्रीम …
साहित्य – तीन केळी,एक वाटी दूध,अर्धा वाटी साय,साखर
कृति –
चांगली पिकलेली तीन केळी घ्यायची.
साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
हे तुकडे एका डब्यात घालून झाकण लावा आणि दोन तास डीप फ्रिज मध्ये ठेवून द्या.
म्हणजे केळ्यांचा गोडवा चांगला उतरतो.
आता हे तुकडे काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
एक वाटी दूध,अर्धा वाटी साय आणि पाच सहा चमचे साखर घाला.
पिकलेली केळी आगोदरच गोड असतात म्हणून साखर अगदी थोडी टाकायची.
तीन मिनिटं मिक्सर मधून चांगलं फिरवून घट्ट मिश्रण बनवायचं.
हे मिश्रण एका घट्ट झाकणाच्या कंटेनर मध्ये घालून आठ तास किंवा रात्रभर डीप फ्रिज मध्ये ठेवा.
बघा कसं सॉफ्ट आईस्क्रीम तयार होईल.
चेरी आणि टुटी फ्रुटीनं सजवून सर्व्ह करा.
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
२. उपवासाचे लाडू …
साहित्य –
एक वाटी साबुदाणा,एक वाटी शेंगदाणे, एक वाटी किसलेलं खोबरं, एक वाटी गुळ,साजूक तूप
कृति- साबुदाणा,शेंगदाणे आणि खोबरं वेग वेगळ भाजून घ्या.
साबुदाणा मिक्सर मधून काढा.
अगदी पिठ नाही करायचं, बारीक रव्या सारखं झालं पाहिजे.
शेंगदाण्याचं भरड कूट करून घ्या.
खोबऱ्याचा किस तसाच घ्या.
आता हे तिन्ही जिन्नस आणि किसलेला गुळ एक वाटी एका परातीत घ्या.
त्याच्यावर तीन चमचे गरम केलेलं तूप घाला.
आणि नीट मिसळून घ्या.
सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या आणि लाडू वळून घ्या.
सजावटीसाठी अर्धा काजू प्रत्येक लाडूवर डोबा.
झाले आपले उपवासाचे लाडू तयार.
हे लाडू पंधरा दिवस सहज टिकतात.
प्रवासात भुकलाडू म्हणून सोबत न्यायला हरकत नाही.
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
३. उपवासाचा बटाटा वडा …
आज नवरतन उपवासाचा सहावा दिवस.
आता कांही चमचमीत खायची अच्छा व्हायला लागलीय ना?
चला तर मग आज करूया …
उपवासाचा बटाटा वडा …
साहित्य –
पाव किलो बटाटे, राजगिरा पिठ, भगर पिठ, जिरे,हिरव्या मिरच्या,मिठ,लाल तिखट आणि तेल.
कृति –
प्रथम बटाटे उकडून थंड करून साल काढून घ्या.
चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिऱ्यांचा ठेचा करून घ्या.
बटाटे कुस्करून त्यात हा ठेचा आणि चवी नुसार मिठ घालून नीट मिसळून घ्या.
एक वाटी राजगिरा पिठ आणि अर्धा वाटी भगर पिठ एकत्र करा.
ह्या पिठात अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी थोडं मिठ टाका.
मिठ बेतानचं घाला कारण आपण बटाट्याच्या मिश्रणात आगोदरच मिठ घातलंय.
मिक्स केलेल्या पिठात थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार करा.
बॅटरची कंसिस्टंसी मध्यम ठेवा.
बटाट्याच्या सारणाचे गोळे करून घ्या.
आता तेल चांगलं तापवून घ्या,मग गॅस मिडीयम करून बटाट्याच्या सारणाचे गोळे बॅटर मध्ये घोळवून वडे तेलात सोडा.
लालसर रंगावर वडे तळून घ्या.
वडे तळताना तयार झालेल्या चुऱ्यात एक चमचा काश्मिरी लाल मिरचीचं तिखट आणि किंचित मिठ घालून मिक्सर मध्ये फिरवून चटणी तयार करून घ्या.
कुरकुरीत आवरणाचे गरमागरम वडे आणि चटकदार चटणीची मज्जा कांही औरच असते.
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
४. उपवासाचं भरीत …
आज नवरतनचा पाचवा दिवस.
आता रोज भाकरी आणि भेंडीची भाजी खाऊन कंटाळा यायला लागला ना?
चला आज कांही चटपटीत करू.
साहित्य – लाल भोपळा,दही,हिरव्या मिरचीचा ठेचा,जिरे,तेल आणि मिठ.
कृति –
पाव किलो लाल भोपळा घ्यायचा. भोपळ्याच्या बिया आणि साल काढून आईसक्यूब सारखे तुकडे करून घ्यायचे.
सर्व तुकडे वाफवून घ्यायचे.
उकडायचे नाहीत,वाफवायचेच कारण उकडले तर पाणी सुटतं आणि भरीत पातळ होतं.
भोपळ्याचे तुकडे थंड झाले की हाताने चांगले कुस्करून करून घ्यायचे.
दोन चमचे दही त्यात घालून मिसळून घ्या.
तीन भाजलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा आणि चवी पुरतं मिठ टाकून मिश्रण नीट एकजीव करा.
एका बाऊल मध्ये काढून घ्या आणि वरून जिऱ्याचा तडका द्या.
झालं आपलं लाल भोपळ्याच उपवासाचं भरीत.
उपवासाच्या गरम भाकरी बरोबर हे भरीत म्हणजे अगदी आत्माशांतच की!
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
५. उपवासाची भजी …
साहित्य –
बटाटे,उपवासाची भाजणी, जिरे,हिरव्या मिरच्या,मिठ, तेल.
कृति –
दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घ्या.
बटाट्याचा कीस तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या,पिळून पाणी काढून कोरडा करा.
दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक चमचा ठेचलेले जिरे घाला.
आता कीसा मध्ये थोडं थोडं उपवासाच्या भाजणीचं पिठ घालत हलक्या हाताने नीट मिसळून घ्या.
पिठ सगळ्या कीसाला व्यवस्थित लागलं पाहिजे.
हे मिश्रण दहा मिनिटे झाकून ठेवा.
तेल तापवून घ्या.
गॅस मेडियम वरच ठेवा.
आता आपल्या मिश्रणात चवी नुसार मिठ घाला व परत एकदा सर्व मिश्रण मिसळून घ्या.
तेलात भजी सोडा.
सोनेरी रंगावर तळून घ्या.
ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
माझे खाद्याचे प्रयोग …
नवरंग रसोई …
६. उपवासाचे गुलाब जामुन …
साहित्य –
मध्यम आकाराची दोन रताळी,मिल्क पावडर,वेलची पूड,खाण्याचा सोडा,साखर,तेल
कृति –
प्रथम रताळी वाफेवर स्टीम करून घ्या.
साल कडून किसणीवर किसून घ्या.
दीड वाटी किस घ्या,त्यात पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाका.
ज्यांना उपवासाला सोडा चालत नाही त्यांनी नाही टाकला तरी चालेल.
आता ह्या मिश्रणात गरजे नुसार मिल्क पावडर मिसळत घट्टसर एकजीव मळून घ्या.
हा गोळा जरा घट्टसरच झाला पाहिजे.
साखरेचा चिकटपणा येईल एवढाच पाक करून घ्या.
तुपाचा हात लावून मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या.
तेल गरम करून मिडीयम फ्लेमवर सर्व गोळे लालसर रंगावर तळून घ्या आणि गरम असतानाच पाकात टाका.
दोन तास मुरू द्या.
आता तयार आहेत आपले रताळ्याचे मऊ लुसलुशीत गुलाब जामुन.
नवरंग रसोई ….
७. राजगिऱ्याच्या वड्या …
नवरात्रीच्या उपवासाला राजगिऱ्याची भाजी चालते.
साहित्य –
राजगिऱ्याच्या भाजीची निवडलेली फक्त पानं एक वाटी,
उपवासाच्या भाजणीचं पिठ एक वाटी,एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे,जिरे एक चमचा,मिठ, तेल
कृति –
राजगिऱ्याच्या भाजीची पानं नीट धुवून कोरडी करा आणि बारीक कापा.
चिरलेल्या भाजीत एक वाटी उपवासाच्या थालीपीठ भाजणीचं पिठ घाला.
आता एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा स्मॅश करून त्यात घाला.
दोन चमचे गरम तेलाचं मोहन,एक चमचा ठेचलेले जिरे,दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवी नुसार मिठ मिसळा.
आता हे सगळ्या मिश्र एकत्र करून मळायच.
गरज पडली तरच अगदी थोडं पाणी वापरा.
हे मिश्रण वीस मिनिटं झाकून ठेवा.
आता परत एकदा गोळा नीट मळून त्याला लंबगोल आकार द्या.
पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा.
एका चाळणीला तेल लावून त्यात गोळा ठेवा, चाळणी पातेल्यावर ठेवा.
झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं स्टीम करून घ्या.
काढून थंड करायला ठेवा.
गोळा व्यवस्थित थंड झाल्यावर सुरीने त्याच्या गोल वड्या कापून घ्या.
तेल गरम करून मिडीयम गॅस ठेवून सगळ्या वड्या लालसर रंगावर तळून घ्या.
आपल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या वड्या तयार आहेत.
कांही लोकांना उपवासाला तीळ चालत नाहीत त्यांनी तीळ वापरू नये.
ज्यांना चालतात त्यांनी किंवा इतर वेळी फोडणीतले तीळ वड्यांवर पसरले तर वड्या आणखी खमंग लागतात.
ह्या वड्या दह्या बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.